Monday, May 26, 2008

Marriage, anyone?

सध्या ऑफिसमध्ये लग्नाचा मौसम चाल्लाय. लोकं एकतर लग्नं तरि करताहेत नाहीतर गेलाबाजार साखरपुडा तरी..त्यातही वर्गीकरण- म्हणजे नुकतंच लग्न ठरलेले, नवविवाहित, अनुभवी आणि बरेच अनुभवी. आमच्यासारखे काही सुदैवी अपवाद वगळता बाकी सारे इकडुन तिकडुन 'तिथलेच'.

लग्नावरून आठवलं...गेल्या शनिवारी ट्रेनमध्ये एक गंमतीशीर जाहीरात पाहीली-" एका सुंदर सुशिक्षित गुजराती मुलाला मुलगी पाहीजे. संस्कारी मुलींनी ताबडतोब संपर्क साधावा.फोन: xxoxoxoxo"

यातला फोन नंबर वगळला (कारण तो तेव्हढा लक्षात रहाण्यालायकीचा नव्हता) तर बाकी शब्द अगदी तंतोतंत तसे होते. पहिल्यांदा मला तो निव्वळ कॉलेजमधल्या पोरांचा वात्रटपणा वाटला. पण याचं वेगळेपण जाणवण्याचं कारण म्हणजे हाताने ठळक अक्षरांत लिहिलेला तो संदेश आणि तो पोचवण्यासाठी निवडलेली जागा-sencond class ladies compartment.

'गुजराती मुलाला मराठीत जाहीरात करायची वेळ का आली' असे क्षुल्लक प्रश्नं आधि येउन गेले. (कारण मुंबईत हे तितकसं 'normal' नाही). त्यानंतर निरुद्योगी पण कुतूहलामुळे प्रेरित झालेला analysis सुरु झाला. म्हणजे एकवेळ 'घरबैठे काम करें, महीना १०,००० कमाऐं', वगैरे छापाच्या जाहीरातींकरता ही जागा आणि पद्धत ठीक आहे...पण हा प्रकार जरा अति झाला. बरं, याला हवी संस्कारी मुलगी. कुठली 'संस्कारी' मुलगी असल्या जाहीरातीला प्रतिसाद देईल? (हे एका मैत्रिणीला सांगितल्यावर, "मग '१०० रुपयांत गर्भपात' या नावाने ट्रेन्समध्ये जागोजाग चिकटलेल्या तुकड्यांमधल्या नंबरांवर फोन करणार्यां बहुतांश मुली 'संस्कारी'च असतात" असं मौलिक ज्ञान मिळालं.) य़ा सुशिक्षित बाळ्याने स्वतःचा सुसंस्कृतपणा मात्र अशा रितीने छान जाहीर केला होता. शिवाय, मुलींनी म्हणे याला ताबडतोब संपर्क साधायला हवा. म्हणजे हा अगदी जशी सणासुदीची ऑफर- घेतली नाही तर चांस गेला.

परंतु अजून थोडा वेळ ती जाहीरात पाहील्यावर असं जाणवलं की ती बर्यापैकी straighforward होती. म्हणजे, थोडक्यात, "मला लग्न करायचंय, नवरी शोधतोय, तुम्ही इच्छुक असाल तर हा मी आहे" असं प्रामाणिकपणे सांगण्याचा तो प्रयत्न वाटला. तसं बघायला गेलं, तर ही जाहीरात आणि एखाद्या विवाहविषयक कॉलम अथवा संकेतस्थळावरची जाहीरात, यांत एक माध्यम सोडलं तर फारसा फरक नव्ह्ता. विश्वसनीयता कुठेही असू शकते किंवा नसू शकते. उलट या युक्तिपासून स्फूर्ती घेऊन उद्या matrimonial site वालेच त्यांच्याकड्ल्या स्थळांच्या जाहीराती अशाप्रकारे करायला लागतील. (बापरे! )

काहीही असो, मला या low cost marketing strategy ची मजा वाटली. अंगातला पूर्वीचा 'जे.जे.' पणा जागा झाला अन असंही वाटलं की या नगाला खरोखरंच फोन करुन जरा गम्मत पहावी...अर्थातच तो सुविचार मोठ्या कौशल्याने झटकला. या गोष्टीलाही काही दिवस होउन गेलेत. न जाणो, आतापर्यंत एखादी 'संस्कारी' छोकरी मिळुनही गेली असेल त्याला...