Saturday, June 20, 2009

An evening in mall

तुम्ही एखाद्याला motivate करण्यासाठी किती आणि कसे प्रयत्न करु शकता? तुमच्या चिकाटीचा कस कितपत लाऊ शकता?.... आता याचं उत्तर "मा़झा कस किनई १-१० च्या स्केलवर ७.५ लागतो" असं होत नाही. पण काही प्रसंग हा कस दाखवुन देतात. तुमच्या क्षमतेची तुम्हालाच नव्याने ओळख होते... आणि त्याचबरोबर अंतर्भूत करायला लावणारे अजूनही काही साक्षात्कार होतात.बर्याच दिवसांनी आज मॉलमधे जाण्याचा योग आला. आईलाही बरोबर घेतलं. तिच्याबरोबर quality time घालवण्याची तेव्ह्ढीच एक संधी. नाहीतर कॉर्पोरेट गुलामीपायी रोज बारा-चौदा तास घराबाहेर घालवणार्या मला तिच्याशी रोज नीट बोलताही येत नाही. नेहेमी सलणारी ही खंत जरा कमी करायची वेळ आज आयती चालून आली. आमच्या बाबांना बाहेर येण्यापेक्षा कुठल्यातरी जुन्या इंडिया-ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅचमध्ये जास्त quality दिसली. त्यामुळे मग आम्ही दोघीच ladies' evening out करण्याकरता बाहेर पडलो.

मुंबईत मॉल हे एक फिरायला जाण्याचं ठिकाण आहे. अर्थात आईलोकांना आमच्याइतकी इथे फिरायची सवय नाही. त्यामुळे तिथे पोचल्यावर "नाहीतरी महाग वस्तुच असतात सगळ्या, त्यापेक्षा दादरला जाऊ इथे पटकन काहीतरी बघून" अशा प्रकारची वाक्यं टाकून झाली. या postच्या सुरुवातीला ज्या चिकाटी शब्दाचा उल्लेख केला आहे त्याला आव्हान मिळाल्याची जाणीव मला तत्क्षणी झाली. मॉलच्या अदृश्य इलेक्ट्रॉनिक द्वारपालांनी आमच्याकरता दारे दोन्ही बाजूंनी उघडली अन आम्ही आत प्रवेश करते झालो.
आता सगळ्यात मोठं दिव्य. समोरचा हत्तीच्या सोंडेसारखा दिसणारा escalator! आमची आई यापुर्वी सरकत्या जिन्यावर गेली नाही असं नाही, पण तो अनुभव घेऊन काही वर्षं लोटली होती, अन त्यावेळी बाबांनी कसंतरी तारु बंदराला लावलं होतं. The journey of a thousand miles begins with a single step...or so they say....इथे तर फक्त single stepच घ्यायची होती. बाकीचं काम escalator करणार होता. पण त्या पहिल्या वहिल्या एकाच पायरीवर पाय ठेवणार कोण? अचानक माझ्या डाव्या हाताला हिसके बसाय़ला लागले. आई सॉल्लीड टरकली होती.

"नको नको, मला नाही जमणार. आपण इथे खालच्या खाली काय ते बघू आणि परत जाऊ."
"अगं काही नाही होत, तू उगाचच घाबरतेयस. त्या बघ तुझ्यापेक्षा मोठ्या बायका कशा व्यवस्थित चाल्ल्यायत. ती आज्जी बघितलीस का?"
"मला त्यांचं सांगु नकोस. माझी साडी अडकली तर? पडले तर? मला confidence नाही. नाहीतर मी इथे थांबते, तू पटकन हवं तर वर जाऊन फिरुन ये."
"अगं असं काही होत नाही आई. मी आहे ना. फक्त माझा हात धर आणि मी सांगते त्या पायरीवर पटकन पाय ठेव."
मागे काही माणसं चुळबुळ करत उभी होती. एक सिक्युरिटी गार्डही काय चाल्लंय म्हणुन बघायला आली. त्यामुळे नाईलाजाने मला बाजूला व्हावं लागलं. आईसाहेबांना तो आपला विजय आणि सुट्का असं दोन्ही वाटलं. पण मीही हे चॅलेंज स्वीकारलं होतं. त्यामुळे गर्दी जाताच माझा धोशा पुन्हा सुरु झाला. शेवटी कशीतरी बिचारी ती तयार झाली.
"नीट पकड मला तोल गेला तर...या वयात पडणं झेपणार नाहीये मला."
"हो गं, उगाच काळजी नको करूस. काहीही होणार नाहीये....चल, ये अशी पुढे..अजून जरा.. आता जी पायरी येईल ना तिच्यावर पटकन पाय ठेव.."
"अरे देवा..."
"अगं रिलॅक्स...तुला धरलंय गं मी...ही बघ आली पायरी, चला पाय टाका बरं पटकन.."

हे बोलताना माझं मलाच हसायला आलं. पण आईने चक्क बरोब्बर पाय टाकला आणि एकदाचे आम्ही मार्गस्थ झालो. क्षणभर तिलाही कळलं नाही की ती escalator वर कशी आली. दुसर्याच क्षणी तिचा चेहरा खुलला. आम्ही दोघीही एकमेकींकडे बघून हसलो. तिचं तिलाच खरं वाटत नव्हतं की ती चक्क escalator वर आलीय. तिच्या चेहेर्यावर एका लहान मुलीचे विजयी भाव होते. अर्थात जसा वरचा मजला जवळ यायला लागला तशी त्या भावांची जागा पुन्हा एकदा भीतीने घेतली. ती तोंडाने देवाची नावं पुटपुटायला लागली होती. मला क्षणभर अपराधी वाटलं. पण तिची भीती घालवणं जास्त गरजेचं होतं.

"आता तुझ्या पायाखालची पायरी जेव्हा सपाट होईल, तेव्हा पटकन पुढे जमीनीवर पाय टाक. खूप सोप्पंय हे." ...यावर मला जो look मिळाला तो इथे शब्दात सांगता येत नाहीये .. असो.

पण तिने 'आता हे करायचंच' या निश्चयाने पटकन escalator च्या बाहेर पाय टाकला आणि दुसर्याच क्षणी आम्ही वरच्या मजल्यावर पोहोचलो होतो.
भीतीची जागा पुन्हा एकदा विजयी मुद्रेने घेतली. माझ्याकडे बघून हसली. म्हणाली, "एखादी गोष्ट करेपर्यंतच तिचा बाऊ वाटतो. भीती कमी झाली आता माझी."
म्हटलं, "परत जाऊ या का?"
"नको नको! आजच्यासाठी एवढं पुरे."
मग मी ठरवलं की हिला अजुन त्रास द्यायचा नाही. Let her enjoy her achievement.. and I'll enjoy mine too. वाटलं, किती घाबरते ही उगाचच. माझ्या patience चा अंत बघितला हिने जवळपास...
....पण याच्याहुन कितितरी जास्त patience हिने घालवला होता की - काहीही न कळणार्या एका लहान छोकरीपायी, एका हट्टी टीनेजरसाठी आणि आता शिक्षण संपवून नोकरी करणार्या, समजूतदारपणाची 'शिंगं' फुटलेल्या एका मोठया मुलीकरता. मला आठवतही नाही अशा कितीतरी पायर्या हिच्यामुळे मी चढले असेन. एका टिपीकल मराठी घरातली ही साधी आई. तिला नवलाईचं कौतुक अन भीतीही. तुमच्या-आमच्या आया काही बाबतीत सारख्याच असतात. मुलांच्या आनंदाकरता का होईना, नवीन गोष्टी स्वीकारतात...आणि कधी कधी त्या गोष्टींच्या प्रेमातही पडतात. आजकाल ही गार्लिक ब्रेड खाते...तिला आवडतो. पास्ताही खायला शिकतेय. इतकंच नव्हे, तर त्याच्या रेसिपीज शोधतेय.

"कसला विचार करतेयस?" आईच्या प्रश्नाने मी पुन्हा भानावर आले.
"चल जरा त्या समोरच्या दुकानात जाऊ. (दुकान?? नशीब 'गाळा' नाही म्हणाली) बरे वाटताहेत तिथले कपडे.."
"आणि दादर?"
"कशाला दादर? आता आलोय ना इथे? उगाच कोण जाणार तिकडे गर्दीतून धक्के खात? चल, काय छान ड्रेस लावलाय बघ तिथे.."

काही अचिवमेंट्स appraisal cycle मध्ये आणि performance rating वर नाही मोजता येत.. त्या फक्त जाणवतात...आणि शप्पथ सांगते, 'exceeded expectations' सारख्या तकलादू वाक्यांपेक्शा लय लय भारी असतात.